मुंबई: तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील आगमनाची चाहूल चाहूल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लागली आहे. गिरगाव येथे गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त तेजस ठाकरे यांचे बॅनर लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र आदित्य ठाकरे हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. पण या सगळ्यापासून कोसो दूर असलेले तेजस ठाकरे हेदेखील राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा अधुनमधून होत असतात. सध्याचा काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी अत्यंत कसोटीचा आणि बिकट आहे. या संकटाच्या काळात वडिलांना साथ देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा गिरगावातील बॅनर्समुळे रंगली आहे.

मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील तेजस यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या परिसरात आकर्षक मिरवणुका निघत असतात. गिरगावातील शोभायात्रेसाठी आलेल्या लोकांचे स्वागत करतानाचे तेजस ठाकरे यांचे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. गिरगावातील शोभायात्रेत आज आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीपेक्षा गिरगावात तेजस ठाकरे यांच्या बॅनर्सची जास्त चर्चा रंगली होती.

तेजस ठाकरेंच्या लाँचिंगवर ‘आदित्य दादा’ची प्रतिक्रिया, उत्तर देताना ठाकरे स्टाईल पंच मारलाच
तेजस ठाकरे यांना वन्यजीवन आणि प्राणीशास्त्रात गती आहे. एरवी ते जंगलातील प्राण्यांचा अभ्यास आणि संशोधनात रमलेले असतात. परंतु, ठाकरेंवर एकापाठोपाठ आलेल्या संकटानंतर तेजस ठाकरे यांच्या राजकीय एन्ट्रीची वारंवार चर्चा होताना दिसत आहे. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी गेल्य वर्षी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात दिली होती. तेव्हापासूनच तेजस हे राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Tejas Thackeray: तेजस ठाकरे जंगलात पाल-सरडे शोधायचे, त्यांना राजकारणाचा काडीचा अनुभव नाही: निलेश राणे

यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावेळीही तेजस ठाकरे यांचे राजकीय लॉचिंग होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर दहीहंडी उत्सवाच्या काळातही गिरगावात तेजस ठाकरे यांचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ असा करण्यात आला होता. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या हातात युवासेनेची सूत्रे दिली जातील, असा अंदाज अनेकांना वर्तविला होता. मात्र, अद्यापपर्यंत तेजस ठाकरे यांनी स्वत:हून राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here