पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने केली. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले.
मुंबईत आज सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘जॉइंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस’च्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत.
पुण्यातही आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होईल.
जेएनयू कॅम्पसमध्ये तणाव
जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.
जयशंकर, सीतारामन यांनी केला निषेध
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यापीठात अशा घटनेला थारा असता नये. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. जयशंकर यांनीही विद्यापाठीत जे घडले ते विद्यापीठाची परंपरा आणि संस्कृतीला छेद देणारे आहे, असे नमूद करत आपला निषेध नोंदवला. सीतारामन आणि जयशंकर दोघेही जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून नोंदवली. राजकारण, विचारधारा कोणतीही असोत, जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेता नये. जेएनयूत ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times