: पोलिसांकडून वाहनधारकांना सातत्यानं नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृतीचा मार्ग देखील पोलिसांकडून वापरण्यात येतो. प्रबोधन, जनजागृती करुन देखील जे लोक नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्यावर मग पोलीस कारवाईचा बडगा उगारतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल सायंकाळी बुलटेराजांवर धडक कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या साथीला मेकॅनिक देखील होते. पोलिसांनी मेकॅनिकांची मदत घेत गाडीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करुन आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या १४५ बुलेटराजांवर कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा बुलेटराजांनी धसका घेतला होता. त्यांनी त्यांची वाहनं पोलिसांच्या कारवाईच्या भीतीनं बाहेर काढलीच नाहीत. पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील बुलेट राजांचे धाबे दणाणले होते. बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्याजागी कर्नकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्या शहरातील १४५ बुलेटराजांचा पोलिसांनी करेक्ट कार्यक्रमक केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोहीम राबवत कारवाई केल्याने बुलेट राजांची तारांबळ उडाली. अचानक सुरु झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे हुल्लडबाजांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी वाहने रस्त्यावर न काढता घरातच ठेवणे पसंत केले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडच्या काळात बुलेटचालक बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्याजागी फटाक्याचा आवाज असणारे आणि धडकी भरवणारे कर्नकर्कश सायलेन्सर बसवत होते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, वृद्ध, तसेच विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने बाबा पेट्रोल पंप, सिडको – हडको, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक इत्यादी पाच विभागात एकाच वेळी अचानकपणे बुलेटसह स्पोर्टबाईकची तपासणी सुरु केली. केवळ तपासणीच नाही तर सोबत मेकॅनिक घेऊन तपासणी करण्यात आली. पाच विभागात एकूण २३७ बुलेट पोलिसांनी तपासल्या त्यातील १४५ बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या एक दिवसाच्या कारवाईतून एकूण १ लाख ४५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मूळ सायलेन्सर आणून बसविल्यानंतर सोडले…..

मोहिमेदरम्यान ज्या ज्या बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलेला आढळून आला, अशा वाहनचालकांना पोलिसांनी मूळ सायलेन्सर आणायला भाग पाडले, ज्यांच्याकडे मूळ सायलेन्सर नाही अशांनी दुकानातून नवीन आयलेन्सर आणून पोलिसांना दिले. पथकासह असलेल्या मेकॅनिकने ते बदलून दिले. मेकॅनिकची मजुरीसह पोलिसांनी प्रत्येकाला दंड देखील आकाराला. शिवाय ज्या वाहनावर लहान मुले, वृद्ध, महिला सोबत होत्या अश्या वाहन धारकांना दंड आकारून त्यांना समज देण्यात आली. ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here