जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे रमेश राठोड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी रमेश राठोड हे त्यांच्या एम. एच. १९ डी झेड १६६० या क्रमाकांच्या दुचाकीने खाजगी कामासाठी शिरसोली या गावात गेले होते.
दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ते दुचाकीने पुन्हा गावी रामदेववाडी येथे परत येत असतांना याचवेळी समोरुन येणाऱ्या एमएच १९ डीव्ही ७५१३ क्रमांकाच्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात रमेश राठोड यांच्या दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश राठोड हे गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. त्यांना लागलीच ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवित असतांना रस्त्यातच त्यांनी प्राणज्योत मालवली.
घटनास्थळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमआडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप पाटील व स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत. कारसह चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी मयत रमेश राठोड यांचा मुलगा राधेशाम रमेश राठोड (वय २३ वर्ष) यांच्या तक्रारीवरुन कार चालकाच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.
देशासाठी कर्तव्य बजावताना जळगावच्या सुपुत्राला वीरमरण; कुटुंब हादरलं, अख्ख्या पंचक्रोशीत आक्रोश
गावात पोहोचणार तोच काळाची झडप
रमेश राठोड पश्चात पत्नी इंदुबाई, राधेशाम व घनशाम अशी दोन मुले व तीन विवाहित मुली असा परिवार आहे. राठोड यांची दोन्ही मुले मजुरी काम करतात. काम आटोपून घराकडे परततण्यासाठी रमेश राठोड निघाले, घरी पोहचणार तोच गावापासून २०० मीटरच्या अंतरावर रमेश राठोड यांच्यावर अपघाताच्या रुपाने काळाने झडप टाकली व त्यांचा अपघातात मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.