जळगाव : जुगार खेळण्यासाठी पहूर येथे गेलेल्या तरुणाचा मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पहूर जामनेर मार्गावरील एका शेतात मृतदेह आढळून आला आहे. सोबत मद्यपान करुन आरोपींनी तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह एका शेतात फेकून दिल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद ऊर्फ बाळू भगवान वाघ (वय ४० वर्ष, रा. शिंगाईत ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे जामनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील शिंगाईत या गावात प्रमोद वाघ हे पत्नी व एक मुलगा या परिवारासह वास्तव्यास होते. मंगळवारी प्रमोद वाघ सकाळीच घरातून बाहेर पडले, यादरम्यान त्यांनी फोनवरुन पाटखेडा येथील शालक यांना पहूर या गावाकडे जुगार खेळायला जात असल्याचे सांगितले होते. मात्र पहूर जामनेर मार्गावरील हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली प्रमोद वाघ यांचा मृतदेह आढळून आला.

शेतमालक प्रफुल्ल पाटील हे सायंकाळ पाच वाजताच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याच ठिकाणी ३ ग्लास, पाण्याची बॉटल व अर्धवट खाल्लेला वडापाव देखील दिसून आला, तर एका बाजूला रक्ताने माखलेला दगड सुद्धा पडलेला होता. तर जमिनीवर सुध्दा रक्त सांडलेले होते. शंका आल्याने प्रफुल्ल पाटील यांनी घटनेची माहिती पहूर पोलीस ठाण्यात कळविली.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मयताच्या पँटवर चॉईस टेलर्स अशी पट्टी आढळून आल्याने जामनेर येथील चॉईस टेलर्सचे संचालक विजय जैन यांना घटनास्थळी बोलावले असता त्यांनी मयतास ओळखले व त्यानंतर मयत हे शिंगाईत गावातील रहिवासी प्रमोद वाघ असल्याचे समोर आले.

जिममध्ये फोन आला, बोलता-बोलता अचानक कोसळला; पुण्यातील तरुणाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण

हत्या केल्यानंतर मयताचा मोबाईल घेऊनही मारेकरी झाले पसार

सोबत मद्यप्राशन केल्यानंतर मारेकऱ्यांनी प्रमोद याच्या डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या केली, त्यानंतर प्रमोद हे मयत झाल्याची खात्री झाल्यावर त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी मद्यप्राशन केले, त्या ठिकाणपासून पंधरा ते वीस फूट अंतरावर फरफटत नेऊन फेकून दिल्याचे समोर आले आहे. मारेकऱ्यांनी पसार होताना मयत प्रमोद वाघ यांच्याजवळील मोबाईल सुद्धा लांबवून नेल्याचे समोर आले आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली, जळगाव येथील न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड व माती ताब्यात घेत, पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मयत प्रमोद वाघ यांचे काका सुभाष सुकदेव वाघ (वय ५८) यांच्या फिर्यादीवरुन पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिंगाईत गावातून दोन जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here