नाशिक : शहरात काल एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली होती. एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले होते. या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. या महिन्याच्या चिमुकलीचा आपल्या जन्मदात्या आईनेच घरातील सुरीने गळा चिरून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित युक्ता भूषण रोकडे या महिलेला अटक केली आहे.

नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना काल घडली होती. धृवांशी भूषण रोकडे (वय ३ महिने) असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. निर्दयी आईनेच हत्येचा बनाव रचत आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा गळा चिरून हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून एकच खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन महिन्याच्या चिमुरडीचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत अज्ञात महिलेने घरात घुसून बेशुद्ध करत मुलीचा गळा चिरला होता. मात्र, या प्रकरणात आईनेच बनाव रचून ही हत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

IND vs AUS : हार्दिक पांड्याची कमाल, ज्यांनी नाकीनऊ आणलं, त्यांनाच इंगा दाखवला, पाहा VIDEO!

तीन महिन्याच्या चिमुरडीची हत्या का केली?

ध्रुवांशी रोकडे हिच्या हत्येचं नेमकं कारण समोर आलं आहे. जन्मदात्या आईने हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. बाळ वडिलांसारखे दिसत असल्याचे नातेवाईक सतत बोलायचे. तसेच पती आणि सासूकडे बाळ जास्त खेळायचे. तिचे सासू, सासरे, दीर यांच्याकडून सातत्याने ध्रुवांशी भूषण रोकडे यांच्यासारखी दिसते, त्यांचेच अनुकरण करते. युक्ताचे अनुकरण करत नाही. त्यामुळे ध्रुवांशीची आई युक्ताच्या मनात ध्रुवांशी बद्दल राग निर्माण झाला आणि त्या रागातून आईने हे पाऊल उचललं.

सोमवारी रात्री सासू आणि दीर घराबाहेर गेले असताना आईने झोपलेल्या ध्रुवांशीचा सुरीने गळा कापला. त्यानंतर सुरी धुवून जागेवर ठेवून दिली. त्यानंतर एका महिलेने तोंडाला रुमाल लावत बेशुद्ध केले आणि बाळाची हत्या केल्याचा बनाव आईने रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

ध्रुवांशीच्या हत्येचा प्रसंग सांगताना युक्ता रोकडे हिने एका अज्ञात महिलेने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचे नातेवाईकांना आणि पोलिसांना सांगत बनाव रचला होता. यानुसार पोलिसांनी घटनेच्या तपासात सुरुवात केली. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता त्यात युक्ताने केलेल्या वर्णनाची संशयित महिला परिसरात दिसूनच आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय हा अधिक बळावला आणि मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी सर्वच नातलंगांसह मृत बाळाची आई युक्त्ताचीही चौकशी सुरू केली.

युक्ताच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांनी युक्ताला घडलेला प्रसंग वारंवार विचारून कसून चौकशी केल्याने अखेर तिनेच घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी हत्या झालेली ध्रुवांशी रोकडे हिच्या आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, युक्ताचा पती भूषण रोकडे याने युक्तासोबत दुसरा विवाह केला होता. त्यांना तीन महिन्यापूर्वी ध्रुवांशी झाली होती. रोकडे कुटुंब हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून ते सध्या नाशिकमधील ध्रुव नगर परिसरात स्थायिक होते.

Gudi Padwa: गिरगावच्या शोभायात्रेत आदित्य दादापेक्षा तेजस ठाकरेंचीच चर्चा, राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here