अदानी नाही तर मग सर्वाधिक नुकसान कोणाचं?
प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. आज जाहीर झालेल्या २०२३ M3M हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार, बेझोस यांनी या कालावधीत $७० अब्ज गमावले असून ही रक्कम मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकत्रित नुकसानीपेक्षा जास्त आहे. उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षभरात गौतम अदानी आणि कुटुंबाचे २८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २१ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली. अशाप्रकारे सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत अदानी सहाव्या तर अंबानी सातव्या क्रमांकावर राहिले.
इतर अब्जाधिशांची स्थिती
बेझोस, अदानी आणि अंबानी व्यतिरिक्त या यादीत एलन मस्क ($४८ अब्ज) दुसऱ्या, सेर्गे ब्रिन ($४४ अब्ज) तिसऱ्या, लॅरी पेज ($४१ अब्ज) चौथ्या आणि मॅकेन्झी स्कॉट ($३५ अब्ज) पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान हुरूनच्या यादीनुसार बेझोसची संपत्ती ११८ अब्ज डॉलरवर घसरली, तर अंबानींची संपत्ती $८२ अब्ज आणि अदानींची संपत्ती $५३ अब्ज इतकी आहे. गेल्या एका वर्षात दर आठवड्याला अदानींना सुमारे ३,०० कोटींचं नुकसान झालं असून सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावरून २३व्या क्रमांकावर फेकले गेले.
भारतातील अब्जाधीश
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मानही गौतम अदानी यांच्या हातातून निसटला आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता ८२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील अतिश्रीमंत बनले. तर जगातील एकूण श्रीमंतांच्या यादीत अंबानी ९व्या क्रमांकावर असून पहिल्या दहामध्ये ते एकमेव भारतीय श्रीमंत आहेत. तर या यादीत अदानी २३व्या, सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला ४६व्या, एचसीएलचे शिव नाडर ५०व्या आणि स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल ७६व्या क्रमांकावर आहेत.