सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील गंगा नगर येथील अनिता चतुर्भुज अहिरवार या महिलेच्या चेहऱ्यावर पोटच्या १६ वर्षीय मुलीने चिकट द्रव्य फेकल्याची घटना घडली. ही घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मोर्णा नदीच्या मोठा पुलाजवळ जवळ आज ४ वाजताच्या सुमारास घडली.
दरम्यान अनिता हिचे तिच्या पतीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत, तेव्हापासून दोघेही पती-पत्नी वेगवेगळे राहतात. आपल्या आई वडील वेगवेगळे राहत असल्याचे त्यांच्याच मुलीला पाहवलं जात नव्हतं. म्हणून तिने अनेकदा दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला की दोघेही सोबत राहा. परंतु तिच्या आईकडून तिला वेळोवेळी सोबत राहण्यासाठी नकार यायचा.
आजही १६ वर्षीय मुलगी आपल्या आईला वडिलांजवळ राहण्यासाठी तयार करायला गेली. परंतु पुन्हा आईचा नकार आल्याने तिचा राग अनावर गेला. यावेळी तिने सोबत आणलेले चिकट द्रव्य म्हणजेच दुचाकीचं पंक्चर काढण्यासाठी चिटकवण्यात येणारं द्रव्य (सोल्युशन) आईच्या चेहऱ्यावर फेकले.
हे द्रव्य तिच्या चेहऱ्यावर तसेच डोळ्यात पण गेल्याने तिला इजा झाली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. लागलीच रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी महिलेला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत महिलेची प्रकृती ठीक असून तिचे डोळेही व्यवस्थित असल्याचे समजते.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा
दरम्यान, या घटनेवेळी नागरिकांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला असता. मुलींनी नागरिकांना चकवा देत पळ काढला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.