ही घटना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील महालब्धा गावात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संदीप आळेकर (वय २८) आणि लता आळेकर (वय २५) असं मृत दाम्पत्याचे नाव आहे.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, आळेकर यांनी कसण्यासाठी जमीन घेतली होती. दोघेही पती-पत्नी ही जमीन कसत होते. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यासह सोयगाव भागात जोरदार पाऊस झाला. शिवाय काही भागात गारपीट देखील झाली आहे. या अवकाळी पावसाने त्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे आळेकर हे चिंतेत होते. मंगळवारी रात्री संदीप आणि लता दोघांनी आपल्या चार वर्षीय एकुलत्या एक मुलाला संदीप यांनी आपल्या भावाकडे दिले.
त्यानंतर, ते दोघेही रात्री शेतात गेले. मात्र, आज सकाळ झाली तरी दोघेही घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता संदीप यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले तर लता या जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक भरत मोरे यांनी दिली आहे.