आज महाराष्ट्राची एकूण गेल्या वर्ष दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकारणाचा खेळ, बट्ट्याबोळ सर्वच पाहत आलो आहे. पण, हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्य बाण तुझं की माझं, माझं की तुझं सुरु होतं, त्यावेळी वेदना सुरु होत्या. जितकी वर्ष लहानपणापासून तो पक्ष पाहत आलो, तो पक्ष जगलो. मला आजही आठवतं की दुसरीमध्ये असताना माझ्या शर्टावरती खिशावरती वाघ असायचा, असं राज ठाकरे म्हणाले.
असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली, अनेक लोकांच्या घामातून उभी राहिलेली पक्ष आणि संघटना मी ज्यावेळी त्या पक्षातून बाहेर पडलो. माझं ज्यावेळी भाषण झालं होतं, त्यावेळी म्हटलं होतं की माझा वाद हा विठ्ठलाशी नसून बाजूच्या बडव्यांशी आहे, असं म्हटलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले. चार माणसं पक्ष खड्ड्यात घालणार म्हटलं होतं, पण त्याचा वाटेकरी व्हायला नको म्हणून मी पक्षातून बाहेर पडलो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
२००६ ला पक्ष स्थापन केला त्या संपूर्ण भाषणात काय झालं, कशामुळं झालं हा चिखल मला करायचा नव्हता, असं राज ठाकरे म्हणाले. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेना प्रमुखपद हवं होतं. ते होऊ शकलं नाही म्हणून बाहेर पडला असं सागितलं गेलं होतं. ते खोटं होतं, असं राज ठाकरे म्हणाले. ते फक्त धनुष्यबाण नव्हतं तो शिवधनुष्य बाण होता. तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांना झेपला. एकाला तो झेपला नाही दुसऱ्याला झेपणार की नाही, असं राज ठाकरे म्हणाले.