या अपघातात जखमी झालेल्या रुपेश रघुनाथ लुबाळ (वय ३४, रा. शिरगाव, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात सत्यवान मधुकर महाडिक (रा. महाडिकवाडी लिंगवरे, ता. आटपाडी, जि. सांगली) यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विरकरवाडी ( ता. माण) गावाच्या हद्दीत अस्मितानगर येथे लुबाळ हे रस्त्याच्या बाजूला गाडी लावून फोनवर बोलत असताना सत्यवान मधुकर महाडिक (रा. महाडिकवाडी-लिंगवरे, ता. आटपाडी जि. सांगली,) यांनी अमली पदार्थाचे सेवन करून ताब्यातील मोटरसायकल (नं. MH 10 DX 2475) ही निष्काळजीपणाने चालवून माझ्या गाडीला ठोकर दिली.’
पुढे तक्रारीत म्हटले आहे की, ‘यामध्ये माझ्या व त्याच्या गाडीचे नुकसान झाले. या अपघातात ते रस्त्यावर पडल्याने त्याचवेळी समोरून येणाऱ्या मानदेश ट्रॅव्हल्सला धडकून स्वतः गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा मुलगा पृथ्वीराज सत्यवान महाडिक याच्या डोक्यावरून ट्रॅव्हल्सचे चाक गेल्याने यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूस सत्यवान हे कारणीभूत आहेत, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.’
या अपघाताचा म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार एस. एस. जाधव अधिक तपास करत आहेत.