राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरु झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काल रात्रीपासूनच या मजारीच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानंतर आज सकाळ उजाडताच मुंबई महानगरपालिकेचे पथक याठिकाणी पोहोचले. पालिकेचे अधिकारी आणि कामगारांनी याठिकाणी येताना सोबत पाडकामासाठी वापरण्यात येणारे मोठे हातोडे, दोरखंड आणि घमेली आणली होती. त्यामुळे माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय, माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक जेसीबीही आणण्यात आला आहे. जेणेकरून मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या पाडकामानंतरचा ढिगारा तात्काळ हटवण्यास मदत होईल.
आज सकाळपासूनच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर तैनात आहे. कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माहीम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
माहीमच्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेच्या लोकांनीही हे पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजीअली तयार केली जात आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले होते.