राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर माहिम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज ठाकरे ज्याठिकाणी अनिधकृत बांधकाम होत असल्याचा आरोप करत आहेत, ती जागा ६०० वर्षे जुनी आहे. आम्ही त्याठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा म्हणजे चिल्ला आहे. याठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जात होते. त्या जागेच्या आजूबाजूला नवीन बांधकाम झालं असेल तर सरकारने त्यावर नक्की कारवाई करावी, असे सोहेल खंडवानी यांनी सांगितले होते.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर तातडीने कारवाई
राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे पार पडला होता. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामचा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कारवाईची चक्रे फिरली आहेत. काल रात्रीपासूनच माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर आज सकाळीच पालिकेचे अधिकारी आणि कामगार याठिकाणी येऊन धडकले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पथक आणि मेरिटाईम बोर्डाचे अधिकारीही संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी आले होते.
राज ठाकरे यांनी एका महिन्यात माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामा पाडा, नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू, असा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाल्याचे दिसत आहे. हा वाद आणखी चिघळण्यापूर्वी मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे. पालिकेचे पथक आज सकाळीच हातोड, दोरखंड आणि घमेली घेऊन माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. दुपारी १२ वाजता समुद्राला भरती येण्यापूर्वीच पालिकेच्या पथकाकडून पाडकाम पूर्ण केले जाईल, अशी माहिती आहे. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर ढिगारा हटवण्यासाठी याठिकाणी जेसीबी देखील आणण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मजारीच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.