राजकीय सत्तासंघर्षामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारतानाचे चित्र अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. त्यामुळे विधानभवनाच्या आवारात घडलेल्या या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत पुन्हा जाण्याची शक्यता दुरापास्त असली तरी देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील हा सुसंवाद अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला.
दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यातही मजेशीर संवाद पाहायला मिळाला होता. आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात विस्थापित कामगारांच्या समस्या उपस्थित करताना त्यांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांची फिरकी घेतली होती. बच्चू कडूंनी लग्नाचा प्रश्न आदित्य ठाकरेंकडे बघून विचारला का? अशी मिश्किल टिप्पणी करताना राज्य सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे फडणवीसांनी म्हटले होते. यावर सभागृहात एकच हशा पिकला होता. आदित्य ठाकरे यांनीही उत्तर देताना, ‘सोबत बसा नाहीतर लग्न लावतो, ही राजकीय धमकी देताय का?’ असा प्रतिप्रश्न विचारला होता. या सगळ्यामुळे सभागृहात कधी नव्हे ते खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसांतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारताना दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.