लेकराने अचानक मृत्यूला कवटाळले; आईला विरह सहन होईना, २० व्या दिवशी तिचंही धक्कादायक पाऊल – the mother also ended her life on the 20th day after the death of the son in paithan taluka
छत्रपती संभाजीनगर : मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर विरह सहन न झाल्याने आईनेही त्या पाठोपाठ राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील बिडकीन मधील शिवनाई गावात समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रुख्मणबाई रमेश काळे (रा. शिवनाई,बिडकीन) असं आत्महत्या करणाऱ्या मातेचं नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, २ मार्च रोजी रितेश काळे या १९ वर्षीय युवकाने आत्महत्या जगाचा निरोप घेतला होता. रितेशने का आत्महत्या केली, याचे कारण मात्र समोर आलेले नव्हते. रितेशच्या आत्महत्येने त्याची आई रुख्मणबाई काळे यांना धक्का बसला होता. मुलाच्या आत्महत्येनंतर त्यांनी बोलणे खूपच कमी केले होते. शिवाय जेवणही जेमतेम करायच्या. तसंच त्या नेहमी एकटे राहायच्या. पाडव्याच्या दिवशी देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ ४ ठार, ११ जखमी
बुधवारी रुख्मणबाई यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत बराच उशीर होऊन त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी बिडकीन पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत असून मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या २० दिवसांनी आईने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.