मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे कलुषित झाले असताना गुरुवारी विधाभवनात घडलेला एका ‘योगायोग’ सगळ्यांच्याच नजरेत भरला. विधानभवनाच्या आवारात आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. गेल्या काही दिवसांत परस्परांविरुद्ध केलेल्या टीकेमुळे एकेकाळी मित्र असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये आता बरेच अंतर पडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आल्यानंतर काय घडणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी आश्चर्यकारकरित्या एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस गप्पा मारतच सभागृहाच्या दिशेने गेले. हा प्रसंग पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोच सभागृहात आणखी एक सूचक प्रसंग घडला.

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे समोरासमोर आले, हसतखेळत गप्पा मारत विधिमंडळात, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात गेल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानपरिषदेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुधीर मुनगंटीवार युती सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या वृक्षसंवर्धन मोहीमेविषयी बोलत होते. त्यांनी म्हटले की, मी २०१६ मध्ये या योजनेची सुरुवात केली तेव्हा राज्याचे सर्व प्रमुख नेते तेथे उपस्थि होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेदेखील झाडं लावण्यासाठी गेले होते, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर सभागृहात बसलेल्या उद्धव ठाकरेंनी शाब्दिक कोटी केली. तुम्ही लावलेल्या झाडांना फळं आलीच नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडाला फळं येतील, असं आम्ही तुम्हाला वारंवार भेटून सांगत होतो. पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं, त्याला आम्ही काय करणार? मी व्यक्तिगत येऊन तुम्हाला भेटत होतो. कोणत्या झाडाला कोणतं खत दिलं पाहिजे, हे सांगत होतो. पण तुम्ही झाडांना दुसरेच खत टाकले, मग त्याला फळं कशी लागणार, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शाब्दिक कोटी केली. तुम्ही मला खताबद्दल सांगत होतात की निरमा पावडरबद्दल. त्यावर मुनगंटीवार यांनी तात्काळा प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते खतंच होतं, फक्त निरमा पाकिटामध्ये आणले होते, त्यावर नाव दुसरं होतं. पण तुमचा गैरसमज झाला. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य करुन उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे पुन्हा सोबत येण्याची साद घातली आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांशी झालेली भेट हा केवळ योगायोग असल्याचा दावा केला. मात्र, विधाभवनात एकाच दिवशी घडलेल्या या दोन सूचक घटनांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here