माहिम मजार

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक माहिम येथील वादग्रस्त मजारीस्थळी दाखल झालं होतं. माहिमच्या समुद्रकिनारी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मजारीच्या सभोवतालचं पाडकाम सुरू करण्यात आलं. आता राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर २४ तासांच्या आत या मजारीच्या आजूबाजूचं पाडकाम करण्यात आलं आहे. मागील दोन वर्षांपासून मजारीच्या बाजूला अनधिकृतरित्या बांधकाम केलं जात होतं. आज केवळ मजारीच्या बाजूचं हे बांधकाम पाडण्यात आलं.
६०० वर्ष जुनी मजार

माहिमच्या समुद्रात ही मजार आहे. या मजारीबाबत माहिम दरगाह ट्रस्टने मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्ष जुनी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हजरत मकदूम अली शाह याच ठिकाणी बसून हजरत ख्वाजा खिज्र अली शाह यांच्याकडून शिक्षण घेत असत. हे ऐतिहासिक ठिकाण आहे. माहीम दर्गाचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांनी या ठिकाणी कोणताही दर्गा बांधण्याचा आमचा विचार नसल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत या मजारीबाबत बोलताना सांगतलं, की काही दिवसांपूर्वी इथे काहीही नव्हतं. आता अनधिकृतपणे मजारीच्या बाजूला बांधकाम करण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. माहिम पोलीस स्टेशन तेथून जवळ आहे. महापालिका कर्मचारी तिथे फिरतही असतात. सर्वजण झोपले आहेत. कोणालाही काही माहित नाही. मजारीच्या आजूबाजूला झालेलं काम हटवण्यासाठी एक महिन्याचा वेळ देतो अशा इशारा राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत केला होता.
समुद्रात दर्गा उभारण्यात येत असल्याचा आरोप

राज ठाकरेंनी माहिम येथील समुद्रात मजारीच्या आजूबाजूला करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यासाठी शिंदे सरकारला अल्टीमेटम दिलं होतं. जर एका महिन्याच्या आत मजारीच्या बाजूला झालेलं अनधिकृत बांधकाम हटवलं गेलं नाही, तर मनसे कार्यकर्ते त्या मजारीच्या बाजूला गणपती मंदिर बांधतील असाही इशारा दिला होता. राज ठाकरेंनी मजारीला दर्ग्याचं रुप दिलं जात असल्याचा दावा करत एक व्हिडिओदेखील दाखवला. व्हिडिओमध्ये असं दिसतंय, की समुद्रात मधोमध एक कबर आहे. तिथे बांधकाम सुरू आहे. काही लोक तिथे प्रार्थना करत असल्याचंही दिसतं व्हिडिओमध्ये दिसत होतं.
कारवाई न झाल्यास मोठं गणपती मंदिर उभारू

राज ठाकरेंनी मजारीच्या आजूबाजूचं बांधकाम हटवण्याचा अल्टीमेटम देत असाही आरोप केला, की मागील दोन वर्षांपासून इथे दर्गा तयार केला जात आहे. आणखी एक हाजी अली दर्गा तयार होत असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरेंनी ड्रोनद्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ दाखवत हा दर्गा कोणाचा आहे असा सवाल केला होता. तसंच एका महिन्याच्या आत या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला मोठं गणपती मंदिर उभारु असा इशारा दिला.