नवी दिल्ली : भाजपनं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या राज्यांमध्ये सत्ता नाही अशा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. राजस्थानमध्ये २०२३ च्या अखेरीस विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपनं राज्यातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलेल आहेत. राजस्थानमध्ये भाजपनं सतीष पुनिया यांच्याकडून जबाबदारी काढून घेतल सी.पी. जोशी यांना पक्षाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय बिहार, ओडिशा आणि दिल्लीमध्ये देखील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या चार राज्यांमध्ये भाजप विरोधी बाकावर आहे. राजस्थानमध्ये सतीश पुनिया यांना हटवून सीपी जोशी यांना संधी देण्यात आली आहे. बिहारमध्ये संजय जयस्वाल यांना हटवून त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. तर, ओडिशामध्ये माजी कॅबिनेट मंत्री मनमोहन सामल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठ वीरेंद्र सचदेवा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

सी पी जोशी यांच्यावर राजस्थानची जबाबदारी

राजस्थानमध्ये खासदार सी पी जोशी यांच्यावर पक्षानं जबाबदारी दिली आहे. पुनिया यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला होता. तरीदेखील पक्षानं त्यांना कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं प्रदेशाध्यक्ष बदलेल आहेत. चंद्र प्रकाश जोशी चितौडगड येथून खासदार असून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजयुमोचं अध्यक्षपद देखील भूषवलं आहे. बिहारचे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांनी राजद आणि जदयूमध्ये काम केलं आहे.

वीरेंद्र सचदेवांवर दिल्लीची जबाबदारी

दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं आता वीरेंद्र सचदेवा यांची नियुक्ती केली आहे. १९९० पासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत.

मनमोहन सामल यांच्यावर ओडिशाची जबाबदारी

भाजपनं समीर मोहंती यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मनमोहन सामल यांच्यावर दिली आहे. मोहंती यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सामल यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here