गेल्या काही काळात भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटाचे राजकीय अस्तित्त्व पुसून टाकण्यासाठी हरप्रकारे आणि शक्य तितके प्रयत्न केले आहेत. त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या क्षणिक (?) मनोमिलनाची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगली होती. हा प्रसंग म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची नांदी आहे का, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. विशेष म्हणजे या सगळ्यानंतर सभागृहातही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे का होईना, परत येण्याची साद घातली. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तुमची भेट नव्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी वरकरणी मजेशीर वाटत असले तरी सूचक इशारा देणारे भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआडच्या चर्चा अधिक फलदायी होते असे म्हणतात. आता भविष्यात आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. आज सकाळी आम्ही दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला.