पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा दुचाकीचा भीषण अपघात झाला. गुळुंब फाट्याजवळ सुरु असलेल्या पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने दुचाकीसह दोघेही ओढ्यामधील पुलाच्या भिंतीवर आदळल्याने यात दोघांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत गंगाराम सोमई यादव (वय ४५, रा. ६९-७० निशीगंध हाऊसिंग सोसायटी यशवंत नगर ता. वाई) यांनी प्रमोद गंगाराम यादव (वय २०) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावरील वृक्षांच्या कत्तलीनंतर सयाजी शिंदे आक्रमक
काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत वेळे ते गुळुंब रस्त्यावर वेळे येथील स्मशानभूमीजवळ पुलाचे काम सुरू आहे. प्रमोद गंगाराम यादव हा आपल्या ताब्यातील टिव्हीएस स्टार कंपनीची मोटरसायकल क्रमांक (MH 11 AN-8222) वरुन वेळेकडून गुळुंबकडे भरधाव वेगात जात असताना पुलावर काम सुरु असल्याने रस्त्यावर पत्रा लावलेला होता. त्यामुळे पत्र्याच्या बाजूने दुसऱ्या साईडने रस्ता काढला होता.
प्रमोदला हा रस्ता न दिसल्याने मोटारसायकलने समोर असलेल्या पुलाच्या भिंतीला जोरात धडक दिली. या धडकेत प्रमोद आणि त्याच्या पाठीमागे बसलेला प्रथमेश संतोष खैरे हे दोघे दुसऱ्या भिंतीच्या खाली मोटारसायकलसह पाण्यात पडले. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी होऊन अपघातात जागीच ठार झाले. अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भुईंज पोलीस ठाण्याचे पीएसआय भंडारे तपास करत आहे.