समाजाच्या हिताचे प्रश्न अधिकाऱ्यांपुढं लोकप्रतिनिधी या नात्यानं मांडणं आवश्यक आहे. सीपीएसच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये उशीर होत असल्यानं असोसिएशन ऑफ सीपीएस अॅफिलिएटेड इन्स्टिट्यूटकडून निवेदन मिळाल्यानंतर पत्र लिहिल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
माझी पत्नी कांचन गडकरी या असोसिएशन ऑफ सीपीएस अॅफिलिएटेड इन्स्टिट्यूटच्या सल्लागार आहेत. समाजसेवा म्हणून ते काम करतात. समाजसेवक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
डॉ. अश्विनी जोशी यांच्या नकारात्मक भूमिकेमुळं सीपीएसच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत उशीर झाला आहे. मी फक्त त्याकडे लक्ष वेधलं होतं, असं नितीन गडकरी म्हणाले. सीपीएसच्या काम करण्याच्या पद्धतीत काही विसंगती असतील तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव या नात्यानं त्यांनी तातडीनं दूर केल्या पाहिजेत कारण सीपीएसच्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु होण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरींनी पत्रात काय म्हटलेलं?
नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रात अश्विनी जोशी यांच्या नकारात्मकतेमुळं कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनची प्रवेश प्रक्रिया रखडण्यात मोठा वाटा असल्याचं म्हटलं होतं. जोशी यांनी ज्या विभागात सेवा दिली, त्या सर्व विभागात त्यांनी सुरळित चाललेल्या कामात अडचणी निर्माण केल्याची उदाहरणे सांगितली जातात, असं नितीन गडकरी म्हणाले.
नीट ही केंद्र सरकारची मार्गदर्शनाखाली घेतली जाणारी परीक्षा असून, त्यातील गुणवत्ता हाच सीपीएस अभ्यासक्रमातील प्रवेशाचा निकष आहे. राज्य सरकारने ही प्रवेश प्रक्रिया राबवण्याखेरीज वेगळे काहीही करणे अपेक्षित नाही. मात्र, इतर राज्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आलेली असताना महाराष्ट्रात ती सुरु देखील न होणे चुकीचे आहे. आधीच पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेल्या डॉक्टरांची कमतरता आहे. त्यात एखाद्या अधिकाऱ्याच्या वर्तनामुळं शेकडो जागा अशाच वाया जाणार असतील तर त्यात आपल्या स्तरावरुन हस्तक्षेप केला जावा, असे वाटते कारण समाज आणि सार्वजनिक आरोग्यासाठी ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचं नितीन गडकरींनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नितीन गडकरींनी त्या पत्रात या प्रकरणाची चौकशी करुन सीपीएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तातडीनं सुरु करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.