अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रीती झांगियानी यांनी महाराष्ट्रातील आर्म रेस्टलिंग समुदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, अधिकाधिक महिलांनी आणि विशेष खेळाडूंनी या खेळात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
प्रीती झांगियानी यावेळी म्हणाल्या की, “डॉ श्रीकांत वालनकर, सचिन मातणे व प्रमोद वालमदे यांसारख्या समर्थ सहकाऱ्यांबरोबर काम करणे आणि संघटनेचे अध्यक्षपद भूषवणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. प्रो पंजा लीगची सहसंस्थापक म्हणून मी करीत असलेल्या कामाप्रमाणेच महाराष्ट्रात सर्वदूर आर्म रेस्टलिंग या खेळाचा प्रसार करणे हेच माझे लक्ष्य आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “आर्म रेस्टलिंग या खेळात सहभागी होण्यामुळे प्रचंड शारीरिक व मानसिक फायदे होत असून त्याद्वारे सुरुवातीला फार मोठे आर्थिक फायदे होत नसले तरी आत्मविश्वास व मनोधैर्य या गुणांची कमाई करता येत असते. त्यामुळेच अधिकाधिक महिला व विशेष खेळाडूंना आर्म रेस्टलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत असतो. माझा जन्म मुंबईत झाला असून महाराष्ट्र हेच माझे घर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची उन्नती व महाराष्ट्रातील खेळाडूंची प्रगती यासाठीच मी काम करत राहीन.”
महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेचे महासचिव व अखिल भारतीय आर्म रेस्टलिंग संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ श्रीकांत वालनकर यांनी प्रीती झांगियानी यांचे नव्या सन्मानाबद्दल अभिनंदन केले. प्रीती झांगियानी यांच्या नियुक्तीमुळे अधिकाधिक महिला खेळाडू या खेळात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, नागपूर येथे आर्म रेस्टलिंग खेळाडू व विशेष खेळाडूंसाठी आर्म रेस्टलिंग व पॉवर लिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राचे आम्ही नुकतेच उदघाटन केले आहे. विशेषकरून महाराष्ट्र भरातील महिला व विशेष खेळाडूंमध्ये आर्म रेस्टलिंग या खेळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कोल्हापुरात लवकरच पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; दीपाली सय्यद यांनी ठणकावून सांगितलं
महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेची सोसायटी ऍक्ट १८६० व महाराष्ट्र शासनाच्या बीपीटी ऍक्ट १९५० अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. या संघटनेच्या वतीने पुणे येथे प्रीती झांगियानी यांच्या नेतृत्वाखाली ३४व्या राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.