पंढरपूरचे माजी शिवसेना शहर प्रमुख संदीप केंदळे या कट्टर शिवसैनिकाचे मंगळवारी सायंकाळी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. पांढरी कावीळ झाल्याने केंदळे यांना पंधरा दिवसांपूर्वी सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या काळात शिवसेनेतील दोन्ही गटांनी त्यांना मदतीसाठी आश्वासन दिली. परंतु ती आश्वासने हवेत विरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
CMO कार्यालयातून रुग्णालयातून फोन…
केंदळे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने अडीच लाख रुपये भरा आणि त्यांचा मृतदेह घेऊन जावा, असं सांगितलं. परंतु केंदळे यांची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढे पैसे भरणं शक्य नव्हतं. केंदळे यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी शिवसेना नेत्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी बरीच धडपड केली पण कुठूनच मदत होत नव्हती. शेवटी केंदळे यांच्या पंढरपुरातील मित्राने शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना फोन केला.
चिवटे यांनी रुग्णालय प्रशासन आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून सगळ्या प्रसंगाचं कथन केलं. रुग्णाच्या कुटुंबियांची अडचण त्वरित सोडवण्याची विनंती केली. केंदळे यांच्या उपचाराचे बिल भरण्याची हमी स्वतः चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आहे, असं म्हटल्यावरही रुग्णालयातील कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते.
शेवटी मी शिवसैनिक बोलतोय हे लक्षात घ्या. तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना त्रास देता आहात.. अशी तंबी दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचा नूर पालटला. पुढच्या काही तासात केंदळे यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. दरम्यान चिवटे आणि रुग्णालय प्रशासनाचं फोनवरील संभाषण ठाकरे गटाचे शिवसैनिक ऐकत होते. संभाषण ऐकल्यानंतर त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.