नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या एका वक्तव्यावरुन गेल्या दिवसांपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचे वातावरण आहे. या सगळ्या गोंधळादरम्यान सत्ताधारी मोदी सरकारला सढळ हस्ते खर्च करण्याच्यादृष्टीने एक अनुकूल गोष्ट घडली आहे. लोकसभेत गुरुवारी कोणत्याही चर्चेविना अवघ्या ९ मिनिटांमध्ये विनियोग विधेयक (Appropriation Bill) मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला आगामी आर्थिक वर्षात ४५ हजार कोटींचा निधी खर्च करता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन भाजप खासदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. तर गुरुवारी काँग्रेसच्या खासदारांनीही आक्रमक होत ‘मोदी-अदानी भाई भाई’च्या घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस पक्षाकडून अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी लावून धरण्यात आली. हा सगळा गोंधळ सुरु असताना सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. गोंधळामुळे सभागृहात दिवसभरात फारसे कामकाज होऊ शकले नाही. अखेर संध्याकाळी ६ वाजता लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी पटलावर मांडण्यात आलेल्या विविध हरकतींच्या मुद्द्यांवर एकत्र मतदान घेतले. हे सर्व हरकतीचे मुद्दे आवाजी मतदानाने फेटाळण्यात आले. यावेळी कोणत्याही चर्चेविना विनियोग विधेयकही मंजूर करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारला आगामी आर्थिक वर्षातील खर्चासाठी ४५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. कोणत्याही चर्चेविना विनियोग विधेयक मंजूर झाल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत वित्त विधेयक २०२३ सादर केले.

पंतप्रधानांनी मौन सोडावे; ‘अदानी घोटाळा’प्रकरणी कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राज्यसभेतही गोंधळ

काल राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झाले. कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच सत्ताधारी खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, ही मागणी लावून धरली. तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानींच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा मुद्दा लावून धरला. या सगळ्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी दोन वाजता पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले. मात्र, त्यावेळी पुन्हा गोंधळ सुरु झाल्याने राज्यसभा पुन्हा तहकूब करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here