महिला प्रीमियर लीगमध्ये आज एलिमिनेटर
हेली मॅथ्यूज ही यंदाच्या डब्ल्यूपीएल मोसमातील सध्याच्या घडीस मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. अखेरच्या गट साखळी लढतीत हेलीने २४ धावांची छोटेखानी खेळी केली होती. मुंबईकडून अमेलिया केर हिने एलिमिनेटरपर्यंतच्या प्रवासात १३ मोहरे टिपले आहेत. यूपी वॉरियर्झच्या एलिसा हिलीने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली असून सहाजिकच हिली यूपीची महत्त्वाची फलंदाज आहे. तर गोलंदाजीत यूपीकडून सोफी एक्लेस्टन हिने १४ विकेट टिपून चमक दाखवत भरीव योगदान दिले आहे. मुंबईच्या अमेलिया केर हिने डीवाय पाटील स्टेडियमवर गोलंदाजीत विशेष चमक दाखवली आहे. ही बाब मुंबईला शुक्रवारी फायद्याची ठरेल.
यांच्यावर असेल लक्ष (मुंबई इंडियन्स)
- हेली मॅथ्यूज : विंडीजच्या आघाडीच्या फळीतील या फलंदाजाने डब्ल्यूपीएलमधील सर्वोच्च नाबाद ७७ धावसंख्या नोंदवली असून स्पर्धेदरम्यान तिने सातत्यपूर्ण कामगिरीही केली आहे.
- हरमनप्रीत कौर : मुंबईचे नेतृत्व करणारी हरमन गेल्या महिनाभरापासूनच फॉर्मात आहे. तिने लीगमध्ये आत्तापर्यंत ४६च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
- अमेलिया केर : या लेगस्पिन अष्टपैलूने यूपी वॉरियर्झविरुद्धच्या साखळी लढतीतही यश मिळवले होते. तिने यूपीविरुद्धच्या लढतींत ३३ धावांत २ विकेट, २२ धावांत २ विकेट अशी कामगिरी केली आहे.
यांच्यावर असेल लक्ष (यूपी वॉरियर्झ)
- एलिसा हिली : अखेरच्या साखळी लढतीत एलिसाने षटकार, चौकार लगावत सूर गवसल्याचे दाखवून दिले आहे.
- ग्रेस हॅरिस : या अष्टपैलूला आठपैकी पाच लढतींत संधी मिळाली, पण तिची धावांची सरासरी यंदाच्या लीगमध्ये सर्वोच्च असून स्ट्राइक रेटही दुसऱ्या क्रमांकाचा आहे.
- सोफी एक्लेस्टन : या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजाने यंदाच्या लीगमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट टिपल्या आहेत.
पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस
महिला प्रीमियर लीग एलिमिनेटर: मुंबई इंडियन्स वि. यूपी वॉरियर्झ
- स्थळ : डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
- वेळ : संध्याकाळी ७.३०
- प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८
- आमनेसामने : दोनवेळा
- मुंबईचा विजय : १
- यूपीचा विजय : १
- सर्वोच्च धावसंख्या २ बाद १६४
- सर्वोच्च धावसंख्या ६ बाद १५९
- गुणतक्त्यातील क्रमांक : मुंबई- २ (८ सामने, ६ विजय, २ पराभव, १२ गुण, नेटरनरेट +१.७११).
- यूपी- ३ (८ सामने, ४ विजय, ४ पराभूव, ८ गुण, नेटरनरेट -०.२००).
- खेळपट्टीचा अंदाज : सामना पुढे सरकत गेला की डीवाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे जाते. १४५ धावांच्या पुढेच लक्ष्य उभे राहण्याची शक्यता अधिक.
- हवामानाचा अंदाज : आकाश निरभ्र असेल. आर्द्रता ५० टक्क्यांच्या वरच असेल.