म.टा.प्रतिनिधी, नगर: नगर जिल्ह्यामध्ये करोना बाधितांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त झालेल्यांची संख्याही चार हजारावर गेली आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास ६४ टक्के आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे ७८ जणांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत सव्वा टक्का आहे.

नगर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच करोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता दिलासादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यापासून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

गेल्या चोवीस तासाची आकडेवारी विचारात घेतल्यास जिल्ह्यामध्ये याकाळात ४३५ करोना बाधित नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा ६ हजार ३४६ झाला आहे. मात्र, याकाळात २६३ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येने सुद्धा चार हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तब्बल ४ हजार २५ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येच्या ६४ टक्के आहे. तर, सध्याच्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या २ हजार २४३ आहे. हे रुग्णही उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे.

दरम्यान, करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये, संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, असे आवाहन जिल्हधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

करोना टेस्ट लॅबची क्षमता वाढवली

जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतीमान झाली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबची क्षमता वाढवण्यात आली असून आता येथे प्रतिदिन एक हजार चाचण्या करणे शक्य होणार आहे. तरी ज्यांना करोनाची लक्षणे असतील, किंवा ज्या व्यक्ती बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या आहेत, त्यांनी जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here