मुंबई: शहरांमधील गृहनिर्माण संस्थांना लवकरच राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून गृहनिर्माण संस्थांकडून आकारण्यात येणारा एन. ए. टॅक्स (अकृषिक कर) वगळला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.

आमदारांनी आणि अनेक गृहनिर्माण संस्थांनी एन. ए. टॅक्स (अकृषिक कर) रद्द करण्यासंदर्भात मागणी केली आहे. या मागणीवर सध्या विचार सुरु आहे. महसूल खात्याने यासंदर्भात या क्षेत्रातील व्यक्तींशी बोलून एक अहवाल तयार केला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ, असे विखे-पाटील यांनी सांगितले. शहरांमध्ये गावठाणाच्या परिसरात न येणाऱ्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांकडून एन. ए. टॅक्सची (अकृषिक कर) आकारणी केली जाते. गेल्या काही दिवसांत एन. ए. टॅक्स वसुली सुरू असल्याने आणि त्या अंतर्गत विविध व्यक्ती, सहकारी संस्था यांना दंड आणि व्याजासहित थकीत कराचा भरणा करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे अकृषिक कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी गृहनिर्माण फेडरेशनकडून करण्यात आली आहे. जवळपास दोन लाख गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ १० ते १५ हजार संस्थांनीच अकृषिक कर भरलेला नाही. हा कर रद्द व्हावा यासाठी सातत्याने मागणी लावून धरण्यात आल्याने सध्या राज्य सरकारने गृहनिर्माण संस्थांकडून अकृषक कर आकारणे थांबवले आहे. मात्र, तरीही गृहनिर्माण संस्थांमधील मालक भाडेकरूंकडून एकरकमी एन.ए. कन्व्हर्जन टॅक्स भरल्यानंतरही प्रत्येक वर्षी अकृषिक कर वसूल करत आहेत.

‘एनए’ करआकारणी तात्पुरती स्थगित

यासंदर्भात अॅडव्होकेट सत्या मुळे यांनी सांगितले की, एकाच परिसरात, गावात किंवा शहरात असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांची तुलना करायची झाल्यास अकृषिक कर हा भेदभाव करणारा आहे. या विषमतेमुळे समानतेच्या मुलभूत हक्काचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारला महसूलाच्या माध्यमातून उत्पन्न हवे आहे. त्यामुळे सरकार सातत्याने अकृषिक दर वाढवत राहते आणि गृहनिर्माण संस्थांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर भरण्याच्या नोटीस पाठवल्या जातात. त्यामुळे हा कर पूर्णपणे रद्द व्हावा, हीच आमची मागणी आहे. राज्य सरकार तो रद्द करेल, अशी आमची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केली.

भूषण देसाई शिंदेंच्या शिवसेनेत ; भाजप आमदार म्हणतात, आमच्याकडे गुजरातची निरमा वॉशिंग पावडर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here