Sangli News : राज्यात सध्या पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चर्चेत आहे. पण ही चर्चा स्पर्धेबद्दल कमी आणि महिला कुस्तीगिरांना स्पर्धेच्या ठिकाणच्या समस्यांचीच अधिक आहे. स्पर्धेच्या ठिकाणी काळोख, पाण्याची आणि जेवणाची नीट व्यवस्था नाही. यामुळे ४०० हून अधिक महिला कुस्तीगिरांचे हाल होत आहेत.

महिलांची राहण्याची व्यवस्थाही नीट नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. मात्र यामध्ये नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला. यामुळे महिला कुस्तीगिरांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं.
एसटी चालक नवऱ्याला रजा मिळेना, चिडलेली बायको थेट आगारात; डेपोत अंथरुणावर झोपून आंदोलन
गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्याचं क्रीडा संकुल हे अंधारात आहे. आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला बसल्याचं समोर आलं आहे. ज्या ठिकाणी या स्पर्धा पार पडत आहेत त्या क्रीडा संकुलाची लाइट गेल्या सात महिन्यांपूर्वीच खंडित करण्यात आली आहे. सुमारे सहा लाखांचं वीज बिल थकीत असल्याने हे कारवाई वीज वितरण विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र याकडे सरकार अथवा जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. तसेच धक्कादायक बाब म्हणजे कोविडच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली होती. आणि त्या काळातील विजेच्या वापराचं हे बिल आहे. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारकडे क्रीडा विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत याला प्रतिसाद मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.