नवी दिल्ली: सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यामुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेतील एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेणुका चौधरी यांना अप्रत्यक्षपणे शुर्पणखा म्हणून संबोधले होते. आता हाच मुद्दा पकडून काँग्रेसने मोदींना घेरले आहे. रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. कोणतेही शिष्टाचार नसलेल्या अतिमहत्वाकांक्षेने ग्रासलेल्या माणसाने मला सभागृहात शुर्पणखा म्हटले. आता न्यायालय किती तत्परतेने हालचाली करते ते पाहू, असे रेणुका चौधरी यांनी म्हटले. डरो मत! राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक; नेत्यांनी डीपी बदलले; शरद पवारांचीही साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
रेणुका चौधरी यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा २०१८ सालचा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत भाषण करत होते. पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान रेणुका चौधरी या मोठ्याने हसल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान मोदी राज्यसभेच्या अध्यक्षांना म्हणाले होते की, ‘रेणुकाजींना काही करू नका. रामायण मालिकेनंतर असं हास्य ऐकण्याचं सौभाग्य आज लाभलं आहे’. तेव्हा मोदींनी रेणुका चौधरी यांनी रेणुका चौधरी यांची तुलना अप्रत्यक्षपणे शुर्पणखेशी (राक्षसी – रावणाची बहीण) केल्याचा आरोप करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? , असा खोचक प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदाराने आक्षेप घेतला होता. आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यावेळी सुरत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्याचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.