कोंढवा पोलिसांनी याबाबत अॅक्शन घेत या टोळीला ताब्यात घेतलं आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चारचाकी अशा विविध गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील टिळेकर नगर येथे काही तरुणांनी आरोपींना शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरून १० ते १२ जण चार चाकीमधून येथे आले. त्यांच्याजवळ असणाऱ्या हत्यारांनी त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे उभ्या असलेल्या जवळपास १४ वाहनांची तोडफोड केली. यात ६ चारचाकी, ३ दुचाकी, ३ टेम्पो, १ रिक्षा यांचा समावेश आहे. या भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून बाकी गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पुणे शहरात अशा घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत असून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तरुण कोणत्याही थराला जाताना पाहायला मिळत आहेत. यात अल्पवयीन मुलांचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागल्याने पुणे गुन्हेगारीचे केंद्र बनतं की काय? अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.