महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह सर्व नेते राहुल गांधी यांच्या बचावासाठी पुढे सरसावले. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारवर अत्यंत तिखट भाषेत टीका केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर काहीवेळातच उद्धव ठाकरे राहुल यांच्या बचावसाठी पुढे येताना दिसले. त्यामुळे या लढाईत महाविकास आघाडी राहुल गांधी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असेल, हा संदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही कारवाई होण्याची शक्यता आहे. मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे राहुल गांधी यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते. तसेच राहुल गांधी यांना त्यांचे सरकारी निवासस्थानही सोडावे लागेल. नवी दिल्ली येथील १२, तुघलक रोड या बंगल्यात राहुल गांधी यांचे वास्तव्य आहे. हा बंगला राहुल गांधी यांना सोडावा लागू शकतो. मात्र, त्यासाठी निवडणूक आयोग आणि अन्य यंत्रणा कारवाईत किती तत्परता दाखवतात, हे पाहावे लागेल.
संसदेत भाजपला जेरीस आणल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई?
सुरुवातीला भाजपकडून ‘पप्पू’ अशी हेटाळणी होणाऱ्या राहुल गांधी यांनी गेल्या काळात भाजपला सातत्याने जेरीस आणले आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी दिलेली’चौकीदार चोर है’ही घोषणा अत्यंत गाजली होती. यानंतर अलीकडेच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो यात्रेमुळे लोकांना राहुल गांधी यांचे नवे रुप पाहायला मिळाले होते. राजकीयदृष्ट्या ही यात्रा अत्यंत यशस्वी ठरली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती.
यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राहुल गांधी यांनी अदानींचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडले होते. राहुल गांधी सातत्याने लोकसभेत मोदी आणि अदानी यांचा एकत्रित उल्लेख करत होते. काँग्रेसकडून सभागृहात ‘मोदी अदानी भाई-भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या. या सगळ्यामुळे राहुल गांधी हे सभागृहात भाजपसाठी डोकेदुखी ठरत होते.