एका अज्ञात महिलेला मारून अडवली भूतवली मार्गे जाणाऱ्या अडवली भुतवली गाव परिसरातील शिळफाटा रोड पलीकडे मोठ्या प्रमाणात पडीक जागा आणि डोंगराळ भाग आहे. त्या परिसरात म्हशींचे तबेले देखील आहेत. या परिसरात ये-जाकरीता कच्चा रस्ता असून कच्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर डोंगराळ भागात गावदेवीचे मंदीर आणि तलाव आहे. त्यामुळे गावातील लोक मंदीरात दर्शनाकरता नेहमी येत असतात.
गावातील अंकुश बबन बुधर आणि त्यांची पत्नी गीता हे गावदेवी मंदीरातून दर्शन घेऊन घरी परतत होते. महापे शिळफाट्याकडून सती देवी या गावदेवी मंदीराकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यालगत तबेलाच्या वरील बाजूस बाभळीच्या झाडाजवळ अडवली या जोडप्याला एक महिला पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी फोन करून सदरची माहिती गावातील प्रतिष्ठित व्यक्ती चंद्रकांत डोळे यांना दिली.
या महिलेच्या डोक्याजवळ एक मोठा सिमेंट काँक्रीटचा दगड पडलेला होता. तसेच तिच्या कपाळावर मोठी जखम झालेली होती. तिच्या अंगात पांढऱ्या आणि काळया रंगाच्या पट्ट्यांचा कुर्ता आणि गुलाबी रंगाचा सलवार होता. तिच्या चेहऱ्याजवळ माश्या घोंगावत होत्या, तिची काही एक हालचाल होत नव्हती. सदर महिलेचा चेहरा पाहून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला ओळखता आले नाही.
चंद्रकांत डोळे यांना खात्री झाली की, सदर महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने तेथे आणून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तिला मारलं असावे म्हणून या घटनेची माहिती त्वरित तुर्भे पोलीस ठाण्यात दिली. घडलेला प्रकार समजतातच तुर्भे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मिळून आलेल्या बेवारस अनोळखी महिला ही मृत असल्याची खात्री केली. त्यानंतर तिचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी वाशी मनपा हॉस्पीटल येथे पाठवला. अनोळखी महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तिला ठार मारले असल्यामुळे तुर्भे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत.
महिलेची ओळख
अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष उंची चार ते साडेचार फुट, रंग गोरा, मध्यम बांधा, चेहरा उभट, कपाळी कुंकू, हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या आणि पिवळ्या धातूच्या बांगड्या, कानात झुमके, गळ्यात काळ्या मण्यांची पोत, अंगात पांढऱ्या आणि काळया रंगाच्या पट्ट्यांचा कुर्ता, गुलाबी रंगाची सलवार त्यावर सफेद टिपक्यांची डिझाइन आहे.