जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले. तोंड लपवून हल्ला करणाऱ्यांचे चेहरे उघडे झाले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील तरूण-विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा शब्दातही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. जेएनयू सारखा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न कोणी महाराष्ट्रात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. राज्यातील विद्यापीठांमध्ये आवश्यकता असल्यास सुरक्षिता वाढवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जेएनयू हल्ल्यानंतर विद्यार्थी युवक शांततेत आपला विरोध दर्शवत असून त्यांच्या मनातील रागाला वाट काढून देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
दिल्ली पोलिसांनी या हल्ला प्रकरणात बघ्यांची भूमिका घेतली. हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे व दोषी समोर आले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times