राहुल गांधी यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास कायद्यानुसार राहुल गांधी यांना पुढील आठ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यान न्यायालयाने नकार दिल्यास त्यांना २०२४ची लोकसभा निवडणुक लढवता येणार नाही. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते, अशा प्रकारे एकूण आठ वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. राहुल गांधी थेट २०३४ची लोकसभा निवडणुक लढवू शकणार आहेत.
राहुल गांधी यांना तरुण नेता म्हणून ओळखले जाते. पण जर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते जेव्हा ६३ वर्षांचे होतील तेव्हाच निवडणूक लढवू शकतील. जर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या तरच राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, राहुल गांधी यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, उच्च न्यायालयात अपील करण्याचा कालावधी देण्यासाठी शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली.
काय आहे प्रकरण?
सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कर्नाटकमध्ये झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केले होते. ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचे आडनाव हे मोदी का असते,’ असे विधान त्यांनी केले होते. या वाक्यावरून भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता.