पोलीस तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींना बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी आणि नखं काळ्या बाजारात विकायची होती. या आरोपींकडून उत्तन परिसरात रानडुक्कर पकडण्यासाठी सापळे लावले जायचे. आरोपींकडून खाण्यासाठी रानडुक्करांची शिकार केली जायची. मात्र, त्यांनी एखादा बिबट्या पकडून त्याची शिकार करायचा प्लॅन आखला असावा, असा अंदाज आहे. काळ्या बाजारात बिबट्याची कातडी आणि नखांना प्रचंड मागणी आहे. यापूर्वीही आरोपींनी बिबट्याची शिकार करूनही त्याचे अवयव काळ्या बाजारात विकल्याचा संशय आहे.
पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. वनाधिकाऱ्यांना उत्तन परिसरात बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर ते याठिकाणी गेले. याठिकाणी सापळ्यात तीन वर्षांची मादी बिबट्या सापडली होती. सापळ्यात अडकल्यानंतर या मादीने सुटण्यासाठी बरीच धडपड केली. या प्रयत्नात तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच पंजाचा भागही खरवडून निघाला आहे. या बिबट्या मादीची सुटका केल्यानंतर वनाधिकाऱ्यांना एका खासगी जागेत दोन रानडुक्करं मिळाली. बिबट्याला अडकवण्यासाठी वापरण्यात आलेल्या सापळ्याचा वापर करूनच या रानडुक्करांना पकडण्यात आल्याचा संशय आहे.
मादी बिबट्याला उपचारानंतर जंगलात सोडणार
मादी बिबट्याला दुखापत झाल्यामुळे तिला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील केंद्रात नेण्यात आले आहे. याठिकाणी या बिबट्यावर उपचार केले जातील. बरी झाल्यानंतर या मादीला जंगलात पुन्हा सोडले जाईल, अशी माहिती वन्यजीव संरक्षक पवन शर्मा यांनी दिली. बिबट्यांचा समावेश शेड्युल-१ श्रेणीतील प्राण्यांमध्ये होतो. त्यांची शिकार करणे हा गुन्हा आहे. याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेल्या डॅनी गोन्सावलिस याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसेच ज्या जागेतून दोन रानडुक्करं मिळाली, त्या जागेच्या मालकाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी खारपाडा टोलनाक्यावर दोन व्यक्तींना अटक केली होती. या दोघांकडे बिबट्याची कातडी सापडली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान एकाने सांगितले की, त्याने रानडुक्कर पकडण्यासाठी जाळं लावलं होतं. मात्र, त्यामध्ये बिबट्या सापडला. मग त्या व्यक्तीने गावठी बंदुकीने बिबट्याला ठार मारले. या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.