परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे परभणीतील खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दुसऱ्यांदा सुपारी दिली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माझ्या हत्येची सुपारी देण्यामागे कोण आहे, याचा छडा लावावा आणि मला पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. स्वतः खासदार संजय जाधव यांनी याबाबतची माहिती दिली असून या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.खासदार संजय जाधव यांना मारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नांदेड येथील दोन रिंदा गॅंगला २ कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा दावा स्वत: जाधव यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लावावा आणि सुपारी देण्यामागे काय कारण आहे, हे तपासावे अशी मागणी केली होती. या प्रकाराला दोन वर्षाचा कालावधी लोटला असतानाच आता जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्याला जीवे मारण्यासाठी तीन कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, आपल्याला एका जवळच्या व्यक्तीने याबाबतची माहिती दिली असल्याचं खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे. आपण सदरील व्यक्तीला सुपारी कोणी दिली आहे, असे विचारले असता तुम्हाला नंतर सांगतो, असं तो व्यक्ती म्हणाला असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे. आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली गेल्याचे समजल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ जीवे मारण्याबाबत कोणी सुपारी दिली आहे याचा छडा लावावा आणि आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, संजय जाधव यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे आणि याप्रकरणी गृहविभागाकडून नेमकी काय कार्यवाही केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंनी मला प्रवेश नाकारला, शिंदेंचं वागणं आता योग्य वाटतं; हर्षवर्धन जाधवांचा ऑडिओ क्लिप ऐकवत खुलासा