सातारा नगरपालिका हद्दीतील विकासकामांवरुन खा. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. एकमेकांवर शाब्दिक वार करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. उदयनराजेंनी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजेंना प्रतिआव्हान देत ‘मी मिशा काढीन, भुवया काढेन’ असे सुनावले होते. ‘अशी व्यक्ती छत्रपती घराण्यात कशी जन्माला आली’ अशा शब्दात वज्रघाती टीका केली होती. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी मुंबई येथे अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना उदयनराजेंवर टीका केली.
घंटागाडी निविदा प्रकरणांमध्ये वेतनाची ओढाताण झाल्यामुळे घंटागाडी चालक आत्महत्या करायला निघाले होते, हे सुद्धा सातारकरांनी जवळून पाहिले आहे. भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना, कास, कण्हेर पाणी योजना असो कोणतीही योजना पूर्ण झालेली नाही. यामध्ये स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देणे सुरु असते. त्यामुळेच विकासाचे गाडे पुढे सरकलेले नाही. जर आव्हान दिले तर ते नक्कीच पाळावे, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला. ‘मी भुवया काढीन, मी मिशा काढीन, समोरासमोर या’ हे उदयनराजेंचे नेहमीचेच डायलॉग आहेत, पण उत्तर मात्र मिळत नाही.सातारकरांना याची सवय झाली आहे. प्रत्यक्षात ते त्यांचा शब्द कधीच पाळत नाहीत. जर आपण सातारा विकास आघाडीचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी गेल्या पाच वर्षांत लोकांनी पाहिले आहे, नाशिक पुणे येथील कंत्राटदारांना कशी टेंडर्स दिली, कसे चेक काढले याची सर्व माहिती जनतेला आहे, मी हे काय स्वतःचे बोलत नाही, हे सर्व वर्तमानपत्रातून छापून आलेला आहे, याकडे शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्ष वेधले.