या हल्ल्यात अजीज शेख याच्या हातावर गंभीर वार झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 326, 323, 504, 506,143,147,148,149 प्रमाणे आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत फिर्यादी महेंद्र म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२४/०३/२०२३ रोजी सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास मी आणि माझा मित्र सागर पाटील कोंबड्या पोहचविण्याचं काम अंबरनाथ पुर्व भागात करीत होतो. त्यावेळी मला सागर भोईर याचा फोन आला की तू लवकर ये. मग मी आणि मित्र अजिज दस्तगीर शेख मोटार सायकलवर तसेच सागर पाटील व कुंदन मडवी हे एका मोटार सायकलवर असे आम्ही सागर भोईरला भेटण्यासाठी गेलो. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मोणेरेगाव उल्हासनगर नं. ४, काजल किराणा स्टोअर्स समोर रोडवरून जात असताना सागर पाटील व कुंदन मडवी हे माझ्या पुढे निघून गेले. तेव्हाच तिथे हातात तलवारी, लोंखडी रॉड लाकडी दांडके घेवून उभे राहीलेले आरोपी आकाश भोईर, आशिश उर्फ बंटी भोईर, सुशिल भोईर, बादल वर्मा कल्पेश आणि इतर ३ ते ४ जणांनी माझी मोटार सायकल थांबून “तुम्ही इकडे का आले” असं बोलून मला व अजित शेख या शिवीगाळ दमदाटी करून मोटार सायकलवर जोर-जोरात त्यांचेकडील हत्याराने मारू लागले. त्यामुळे आम्ही दोघे खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपी आकाश भोईर व सुशिल भोईर यांनी तलवारीने माझ्या पाठीवर हातावर तसेच अजिज दस्तगीर शेख याचे हातावर वार केले. त्यात माझ्या पाठीवर तसेच अजिज दस्तगीर शेख याच्या उजव्या हातावर, पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली आहे.’
या माहितीनंतर, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.