म. टा. प्रतिनिधी, पुणे : सिंधुदुर्गमधील रामगड हा सुपरिचित किल्ला असताना आता अभ्यासकांनी रत्नागिरीमध्ये पालगड गावाजवळील रामगड हा अप्रकाशित दुर्ग प्रकाशात आणला आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व अभ्यासक सचिन जोशी यांनी रामगडाचा शोध लावला असून, त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तूरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.इतिहास संशोधक मंडळामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत परांजपे आणि जोशी यांनी रामगडाचा अहवाल सादर केला. यावेळी अभ्यासकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. रामगड हा अप्रकाशित दुर्ग असल्याचे बैठकीतील चर्चेतून निष्पन्न झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड हा छोटेखानी किल्ला आहे. रामगड हा पालगडाचा जोडकिल्ला असून, आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले असून, यातील पहिला, सर्व परिचित रामगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे. दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली हे आज ज्ञात नाही. मात्र, पालगडाबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा, अशी माहिती संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी ‘मटा’ला दिली.
किल्ल्याच्या सॅटेलाइट इमेजही काढल्या असून, काही बांधकामाचे अवशेष दिसले आहेत. सर्वेक्षणात किल्ल्याचा दरवाजा, त्याचे दोन संरक्षक बुरुज, तटबंदीतील चार बुरुजांसह सहा-सात इमारतींचे अवशेष, काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
– सचिन जोशी, पुरातत्त्व अभ्यासक, डेक्कन कॉलेज
ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये मिळालेल्या काही नोंदींच्या आधारे मी महिन्याभरापूर्वी रामगडाचे सर्वेक्षण केले. गावकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांनी मला दुसराच गड दाखवला. अजून खोलात जाऊन सर्व संदर्भ तपासले आणि प्रत्यक्ष पाहणीतून मिळालेल्या शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे रामगड हा दुर्ग असल्याचे स्पष्ट झाले.
– डॉ. संदीप परांजपे, दुर्ग अभ्यासक