राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.
‘भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये जाणार’
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत हे लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून एक व्यापक अशी योजना तयार केली जाईल असे राऊत म्हणाले. शरद पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पवार यांच्यामुळेच बनले शिवसेनेचे सरकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात ज्येष्ठ नेते आहे आणि म्हणूनच त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे राऊत म्हणाले. पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कुशाग्रता पाहता त्यांना भारताचा घटनात्मक प्रमुखपदावर बसवणे योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान असल्याने पवार यांच्याप्रती राऊत यांची नैतिक जबाबदारी आहेच, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times