धाराशीव : आई आणि दोन लेकरांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली आहे. हा अपघात की आत्महत्या हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. ही घटना तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री बाबुराव तांबे (वय ४० वर्ष), समर्थ बाबुराव तांबे (वय १० वर्ष) आणि दुर्वा बाबुराव तांबे (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, समर्थ हा ४ थी इयत्तेत तर बहीण दुर्वा तांबे ही इयत्ता २ रीमध्ये शिकत होती. समर्थ आणि दुर्वा यांची शाळा सुटल्यानंतर त्यांची आई भाग्यश्री या आपल्या मुलांना घेऊन कुंभारी शिवारातील स्वतःच्या शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान काही वेळानंतर सुशांत स्वामी हे पाणी आणण्यासाठी आदेश स्वामी यांच्या शेतातील विहिरीवर गेले असता या तिघा माय-लेकरांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला.

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. तसंच पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तुळजापूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशीलकुमार चव्हाण, विठ्ठल चासकर, पो. हे. कॉ. वैभव देशमुख, गणेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

आदेश स्वामी यांच्या खबरीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही.

दरम्यान, मयत भाग्यश्री तांबे यांचे पती बाबुराव तांबे हे सहा वर्षापूर्वी कॅन्सर या दुर्धर आजाराने मयत झाले होते. त्यामुळे सासू, एक मुलगा आणि दोन मुलींची जबाबदारी भाग्यश्री यांच्यावर पडली होती. शेती ही तलावाच्या खालीच्या बाजूस असल्याने जमिनीत सतत ओलावा असल्याने अपेक्षित उत्पन्नही मिळत नव्हते. त्यानंतर एक मुलगी ह्रदयविकाराने मयत झाली होती. अशी अनेक संकटं येत असल्याने व शेतातूनही काहीही उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. या नैराश्यातूनच महिलेने आपल्या मुलांसह आत्महत्या केली असावी, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here