त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. हल्ल्याचे नेमके कारण शोधायचे आहे. तसेच स्थानिकांनी केलेले रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फूटेज जमा करायचे असून चेतन याने ज्या दुकानात चाकू खरेदी केला, त्याची साक्षदेखील घ्यायची आहे, असे सांगत पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. मी पत्नी आणि मुलांपासून दूर राहत असल्याने मानसिक तणावाखाली होतो. ५० दिवसांपासून पत्नीला घरी परतण्याची विनंती करत होतो, पण ती ऐकत नव्हती. त्यामुळे राग अनावर झाला आणि हे कृत्य घडले, असे चेतन याने न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चेतनला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
हल्ला करण्याचा विचार नव्हता पण…
अगदी शेजारी राहणारे मिस्त्री दाम्पत्य आणि चेतन गाला यांच्यामध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, तो मिटविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हापासून मिस्त्री यांच्याबद्दल चेतनच्या मनात राग खदखदत होता. त्यातच पत्नीला आपल्यासोबत न राहण्यास हेच दोघे फूस लावत असल्याचा संशय होता. त्यामुळे त्या दोघांवर हल्ला केला. इतरांवर हल्ला करण्याचा विचार नव्हता, पण चारही बाजूंनी सुरू असलेली आरडाओरड, आपल्यालाच दोषी असल्याच्या नजरेतून सर्वच जण बघत असल्याने संताप अनावर झाला आणि जो मध्ये येईल त्याच्यावर चाकू फिरवला, असे चेतन याने चौकशीत सांगितले.
आर्थिक चणचण हेही कारण
चेतनचे कपडेविक्रीचे दुकान होते. ते पुनर्विकासात गेले तेव्हा पहिल्या मजल्यावर मिळाल्याने फारसे चालत नव्हते. त्यामुळे त्याने ते भाड्याने दिले. मुलाचा पगार आणि दुकानाचे भाडे यावर घर चालत होते. आर्थिक चणचण भासत असल्याचे दुकान आणि घर विकून दुसरीकडे घर घेऊन राहू या, असे तो वारंवार सांगत होता. मात्र पत्नी आणि मुलाचा यास विरोध होता आणि यावरूनही दोघांमध्ये अनेकदा खटके उडत होते, अशीही माहिती समोर आली आहे.