जवाहर राठोड असे प्रगतीशील शेतकर्याचे नाव असून ते दारव्हा तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या एका एकर शेतीत त्यांनी ऑर्कीड फुल शेती करण्याचे ठरविले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात उष्ण तापमान राहत असल्याने शेती फुलणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. सुरुवातीला निराशा आली. तरी राठोड दाम्पत्याने तीन दिवसाचे प्रशिक्षण घेतले. काही झाले तरी चालेल, एक पाऊल पुढे टाकायचे असे ठरवून ऑर्कीड फुलशेती करण्याचा निश्चय केला. शेतात पॉलीहाऊस बांधून पुणे येथील कंपनीच्या माध्यमातून थायलंड येथून ऑर्कीडचे रोपटे मागवले. हे रोपटे मातीत लागत नाही. त्याची लागवड कोको सेलमध्ये करावी लागते. कोकोसेल आणि पाणी यावरच ऑर्कीडचे रोपटे जगते.
सहा महिन्यात ऑर्कीड फुलशेती बहरली असून, पहिल्याच वर्षी आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतकर्याला आहे. पुढील वर्षी वीस लाखाच्या घरात उत्पन्न येण्याचा आशावाद शेतकर्याने व्यक्त केला आहे. या फुलशेतीमुळे आठ ते नऊ जणांना रोजगार मिळाला आहे.या फुलाला दिल्ली मुंबई, हैदराबाद, नागपूर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकर्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान आत्मसाद केल्यास इतरही शेतकरी आर्थिक उन्नती करू शकतात, वंदना राठोड म्हणाल्या.
पॉलिहाऊसमध्ये करण्यात आलेला ऑर्कीड शेतीचा प्रयोग चांगला असून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत असून नाविन्यपूर्ण शेती ही सकारात्मक बाब असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेतून २५ लाख रुपयांचं अनुदान देण्यात येतं, असं यवतमाळचे जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी सांगितलं.