नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन दिवस अगोदर दाखल झाले होते. आजच्या सभेत भाषण करताना सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, एकनाथ शिंदे यांच्या शेतातील हेलिपॅड असणं पण शेतीच्या नुकसानाची पाहणी न करणं, कृषीमंत्र्यांकडून रात्रीच्या अंधारातील पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचं जागा वाटपाचं वक्तव्य, भाजपला निवडणुकीचं चॅलेंज देताना राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे उद्धव सांगितलं. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं सांगताना उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या नातीची चौकशी करण्यात आली तसंच लालूप्रसाद यादव यांच्या गर्भवती सुनेची चक्कर येईपर्यंत चौकशी करणं या मुद्यांवरुन ठाकरे यांनी टीका केली.

शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन टीका

उद्धव ठाकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांचा प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी दोन शेतकऱ्यांचा दाखला दिला. रतनकाका भागवत आणि कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्तर द्या, असं चॅलेंज ठाकरे यांनी दिलं. यावेळीच त्यांना सुहास कांदे यांच्यावर टीका केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे काळोखात पाहणी करत असून त्यांना दिव्यदृष्टी असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

भाजपला निवडणुकीचं चॅलेंज

चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष असतानाचं मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य, त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांचं जागा वाटपाचं वक्तव्य याचा दाखला देत ४८ नाहीतर ५२ जागा त्यांना द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आताच निवडणूक घ्या, तुम्ही मोदींच्या नावानं मतं मागा मी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागतो, असं ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार हे जाहीर करा, असं आव्हान देखील त्यांनी दिलं.

देशमुखांच्या नातीची आणि लालूप्रसाद यादवांच्या सुनेच्या चौकशीचा मुद्दा

हिंडेनबर्ग रिपोर्टच्या अहवालावरुन उद्धव ठाकरे यांनी देशातील तपास यंत्रणांच्या गैरवापरावर हल्लाबोल केला. अनिल देशमुखांच्या नातीची चौकशी करण्यात आली. तिकडे लालू प्रसाद यादव यांच्या सुनेची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करण्यात आली,असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या कुटुंबीयांना एक न्याय आणि आमच्या कुटुंबीयांना एक न्याय असा नियम लावला जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधीच्या २० हजार कोटींच्या प्रश्नावर भाजपची गुपचिळी असून आपली एकी फोडण्यासाठी राहुल गांधींना डिवचलं जातंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कांद्यांची खरेदी, कृषीमंत्र्यांना दिव्यदृष्टी, एकनाथ शिंदेंच्या शेतातील हेलिपॅड, उद्धव ठाकरेंनी सगळं काढलं

सावरकर आमचं दैवत, अपमान सहन करणार नाही, राहुल गांधींना इशारा

आपण एकत्र आलो आहोत, लोकशाही वाचवण्याठी एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सांगितलं. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करु नये. सावरकरांनी जे कार्य केलं ते येड्यागबाळ्याचं काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष रोज मरण सहन केलं असून ते आमचे दैवत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

खेडच्या सभेचा ट्रेंड मालेगावात कायम

उद्धव ठाकरे यांनी खेडच्या सभेत रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर एका शब्दानं देखील टीका केली नव्हती. आज देखील उद्धव ठाकरे यांनी मालेगावात सभा घेतली पण दादा भुसे यांच्यावर एका शब्दानं देखील टीका केली नाही. ज्या नेत्याच्या होम ग्राऊंडवर सभा घेत त्या ठिकाणी तिथल्या सोडून गेलेल्या नेत्याचा नामोल्लेख टाळण्याचा ट्रेंड उद्धव ठाकरे यांनी मालेगावात कायम ठेवला.

चंद्रकांतदादा, बावनकुळेंचा दाखला, निवडणुकीचं चॅलेंज, ठाकरेंचं भाजपच्या वर्मावर बोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here