नाशिक: मालेगावात आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर नेते, भाजप सर्वांवर एकएककरुन तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरेंनी कांदा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्नही मांडला. तसेच, शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह त्यांच्यापासून हिरावून घेतलं याबाबतही त्यांनी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– त्यांनी नाव, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही तरी इतकी गर्दी आहे. ही पुर्वजांची पुण्याई आणि जगदंबेची कृपा आहे. मी मुख्यमंत्रीदपासाठी नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढतोय. जिंकेपर्यंत लढायचं, जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

– आजची सभा बघून शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही. नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, जीवाभावाची प्रेम करणारी माणसं चोरु शकत नाही, ही भाड्याने आणता येत नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला मारला.

– मुख्यमंत्री शेतीत रमले पण त्यांच्या शेतीत दोन दोन हेलिपॅड आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात. स्वत:च्या शेतात रमतात पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी आहे ते काळोखात जाऊन नुकसानाची पाहणी करतात, महिलांना शिव्या देतात, सुप्रिया सुळेंना शिवी दिली, तरीही निर्जल्लासारखे मांडीला मांडी लावून बसतात हे यांचं हिंदुत्व आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

एक कांदा ५० खोक्याला, मग तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे : उद्धव ठाकरे

– सत्ता गेल्याचं दु:ख नाही, चांगलं काम करणाऱ्यांचं सरकार तुम्ही गद्दारीने पाडलं आणि शिवाजी महाराजांचा भगवा हाती घेऊन फिरता. हे खंडोजी खोपड्याची औलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही, असंही ते म्हणाले.

– मी शिवसेनाच म्हणेन कारण शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे मिंधेंच्या वडिलांनी नाही, ज्यांना स्वत:च्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचं नाव तुम्ही चोरता, असंही ते म्हणाले.

चंद्रकांतदादा, बावनकुळेंचा दाखला, निवडणुकीचं चॅलेंज, ठाकरेंचं भाजपच्या वर्मावर बोट
– ही लढाई माझ्या एकट्याची नाही देशाच्या लोकशाहीची आहे. ज्या दिवशी न्यायालयातील रामशास्त्री माणस संपेल आणि केंद्राच्या पालथी वाहणारे न्यायमूर्ती तिकडे बसतील, त्यादिवशी लोकशाहीची श्रद्धांजली वाहण्याची सभा आपल्याला घ्यावी लागेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोमणा मारला.

– भाजप मिध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का, हे भाजपने जाहीर करावे, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. तसेच, जर भाजपला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करु शकत नाही, प्रयत्न करुन पाहा, तातडीने निवडणुका घ्या. हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो, बघू महाराष्ट्र कोणाला कौत देतो, असं आव्हान त्यांनी दिलं.

– एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करु नये. सावकरांनी जे कार्य केलं ते येड्यागबाळ्याचं काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष रोज मरण सहन केलं, असंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न,भाजपला निवडणुकांचं चॅलेंज, सावरकरांचा मुद्दा, ठाकरेंकडून खेडचा ‘तो’ ट्रेंड मालेगावात कायम

– राहुल गांधीच्या २० हजार कोटींच्या प्रश्नावर भाजपची गुपचिळी. आपली एकी फोडण्यासाठी डिवचलं जातंय, राहुल गांधीना ठाकरेंचा सल्ला.

– टीका केली की घरात पोलीस घुसतात, कुटुंब टार्गेट केलं जातं. मुख्यमंत्री असताना मी हिंदुत्व सोडल्याचं उदाहरण दाखवा. राजकारणासाठी कुटुंब वेठीस धरणं अमानुष आहे. अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या मुलीची चौकशी, लालूंच्या गरोदर सुनेची चौकशी केली, असं म्हणत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here