आरे कारशेडचे काम ५४ टक्के पूर्ण झाले असून येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळं लवकरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे

 

mumbai metro
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बहुचर्चित आरे येथील कारशेडचे ५४ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. तर मेट्रो ३चा पहिला टप्पा म्हणजेच वांद्रे ते सीप्झ हा मार्ग येत्या वर्षाअखेरीस किंवा जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी मेट्रो ३सह मुंबईतील सर्वच मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती सांगितली.‘मुंबईसाठी हा सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प असून ४० किलोमीटरचा हा भूमिगत मेट्रो प्रकल्प आशियातील सर्वांत लांब सिंगल लाइन प्रकल्प आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरे कारशेडचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तीन वर्षे काहीच काम झाले नाही. नवीन सरकार आल्यानंतर कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविण्यात आली. बंद असलेले काम पुन्हा सुरू केले. येत्या डिसेंबरपर्यंत कारशेडचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे वांद्रे ते सीप्झदरम्यानचा पहिला टप्पा सुरू करता येणार आहे,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तिसरी आणि चौथी ट्रेनसुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो ३ प्रकल्पाचे ८० टक्के पूर्ण झाले,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

नऊ मार्गिकांचे काम ४०-७० टक्क्यांपर्यंत

‘मुंबई महानगर क्षेत्रात एकूण ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रोची कामे सुरू आहेत. २०१४ ते २०१९ या काळात मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले. तेव्हा ३३७ किमीचे हे प्रकल्प अनेकांना स्वप्न वाटत होते. पण, आज यातील नऊ मोठ्या मार्गिकांचे काम ४० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आज एकूण ३३८ किमीची मेट्रोची कामे सुरू आहेत. एकूण १४ मार्गिका, २२५हून अधिक स्थानके असून सुमारे दीड लाख कोटींहून अधिकची ही कामे आहेत. २०३१पर्यंत एक कोटी प्रवाशांच्या मेट्रो प्रवासाचे नियोजन आहे,’ असे फडणवीस यांनी अधोरेखित केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here