या सभेत संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान राजकीय फटकेबाजी केली. शिवसैनिकांचा जनसागर, एक तुफान उसळला आहे, याला आता कोणी थांबवू शकत नाही. शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर निवडणूक आयोगाने इकडे येऊन पाहावं, त्यांच्या बापाला विचारुन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नाही, अशा शब्दांत राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. मालेगावातील सभेमुळे महाराष्ट्र आणि देशभरात संदेश गेला आहे की, शिवसेना झुकलेली नाही, तुटलेली नाही, वाकलेली नाही, सगळ्या जातीधर्माचे लोक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहेत. निवडणूक आयोगाने चिन्ह, नाव काढून घेतलं असेल. तरी बाळासाहेबांनी तयार केलेली ही शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत उभी आहे, राज्यात पुन्हा आपली सत्ता येईल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, यासाठी आपण तयारी करायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आपल्या भाषणात संजय राऊत यांनी मालेगावचे आमदार दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असे सांगत त्यांनी दादा भुसे यांना डिवचले. तर कांद्याच्या मुद्दा उपस्थित करताना राऊतांनी सुहास कांदे यांना लक्ष्य केले. शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे, बेरोजगाऱ्यांचे प्रश्न आहे, कांद्याला भाव नाही, पण आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचं आहे आणि कांद्याला भाव द्यायचा आहे, गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सुहास कांदेंचा पलटवार
मालेगावच्या सभेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. या टीकेला सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला. हे सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली.