अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला होता. श्रीगोंदा तालुक्यात दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलित केले जाते. परंतु दुध भेसळीचा पर्दाफाश केल्यानंतर आता श्रीगोंदा तालुक्यात ५० ते ६० हजार दूध संकलन होऊ लागले आहे. केमिकल व पावडर वापरून बनावट दूध तयार केले जात असल्याची महिती मिळाल्यानंतर अन्य औषध प्रशासनाने छापा टाकून १० आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपी फरार आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातून दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलन व्हायचे. प्रशासनाला बनावट दूध तयार होत असल्याची कुणकुण लागली. धाडी टाकताच बनावट दूध तयार करण्याचे साहित्य सापडले. मात्र, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईनंतर तालुक्यातील दुधाचे संकलन थेट ६० हजार लिटर वर आले आहे. याचा अर्थ श्रीगोंद्यामध्ये दिवसाला १ लाख लिटर बोगस दूध संकलन होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबईकरांच्या जिवाशी खेळ; दूध भेसळीचा कारखाना पाहून पोलीस हादरले…

काष्टी येथील बाळासाहेब पाचपुते यांच्या डेअरी फार्मवर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी बाळासाहेब पाचपुते फरार असून संदिप संभाजी मखरे, वैभव रामदास राऊत, दीपक विठ्ठल मखरे,निलेश तुकाराम मखरे, संदीप बबन राऊत, राहणार श्रीगोंदा, कैलास बाबाजी लाळगे (शिरूर जिल्हा पुणे), वैभव जयप्रकाश हांडे (उंब्रज जिल्हा पुणे), संजय तुकाराम मोहिते (पारगाव सुद्रिक), विशाल अशोक वागस्कर (सुरोडी), अनिल काशीनाथ कुदांडे (भानगाव) अशा दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

नाशिककरांच्या जीवाशी खेळ; दुधात रासायनिक पावडरची भेसळ

केमिकल पुरवणारा आरोपी फरार

श्रींगोदा येथे इतक्या मोठ्याप्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासन आणि पोलीस स्तरावरुन कारवाईची सूत्रे वेगाने हालताना दिसत आहेत. परंतु, दुधात भेसळ करण्यासाठी केमिकल पुरवणारा संशयित अद्याप फरार आहे. आरोपींकडून राज्यातील आणख्या कोणत्या ठिकाणी दूध भेसळीसाठी केमिकलचा पुरवठा केला जात होता, याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दूध भेसळीच्या या रॅकेटमध्ये दुग्ध व्यावसायिक, दूध डेअरी, संघ यांच्याशी निगडीत अनेक व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यामुळे दूध भेसळीचे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे हे पोलिसांसाठी आव्हान असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here