आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९.८० अंक वाढीसह ५७,५६६.९० वर उघडला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ३९.२५ अंक किंवा ०.२३ टक्के वाढून १६,९८४.३० वर खुला झाला. मागील सत्रात सेन्सेक्स ३९८ अंकांनी घसरून ५७,५२७ वर, तर निफ्टी १३२ अंक घसरून १६,९४५ वर क्लोज झाला होता.
सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची स्थिती
आज बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ समभाग सुरुवातीच्या व्यापारात तेजीत व्यवहार करत असताना बँकिंग समभागांतील घसरण बाजाराला खाली खेचत आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्समध्ये घसरण होत असताना याशिवाय निफ्टीच्या ५० पैकी २३ समभागांमध्ये तेजी तर २६ समभागांमध्ये घसरले आहेत. याशिवाय एका स्टॉकमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
बँकिंग शेअर्समध्ये पडझड
आज सकाळच्या व्यवहार सत्रात बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारातील सुरुवातीची तेजी फुस्स झाली असून ही घसरण मार्केटला फारशी वाढ घेऊ देत नाहीत. अपोलो हॉस्पिटल्स, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, हिंदाल्को आणि डिव्हिस लॅब निफ्टीच्या टॉप गेनर्स तर महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, टायटन आणि ॲक्सिस बँक हे टॉप लूसर्स ठरले. याशिवाय अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून येत आहे. अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये घसरण होताना अदानी ग्रीन आणि एनडीटीव्हीमध्येही तेजीचा कल दिसत आहे.