मात्र, आगीचं रौद्र रुप पाहता ग्रामस्थ हतबल होते. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, बैल वाचवू शकले नाहीत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाड जवळ असलेल्या वहूर गावाच्या हद्दीत झटाम मोहल्ल्यामध्ये सधन शेतकरी रफीक मोहमद सईद झटाम यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला मोठी आग लागली. आग लागली तेव्हा बैलांचा हंबरडा हा काळीज पिळवटून टाकणार होता. ग्रामस्थांनी गोठ्यावर पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. काही वेळातच महाड नगरपरिषद आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशमन बंब या घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या गोठ्यातील चारही बैल खास शर्यतीमध्ये धावण्यासाठी होते. त्यातील एकजोडी समुद्रकिनारी धावणारी तर दुसरी जोडी माती बंदराला धावणारी होती. रफिक झटाम यांनी एक जोडी कर्नाटकमधून खरेदी केली होती. तर दुसरी जोडी अलिबागमधून खरेदी केली होती. त्यांची किंमत सुमारे १० लाखांवर होती, असं त्यांनी सांगितले. आगीत गोठ्यातील अन्य चार लाखांचे साहित्य देखील जळून खाक झाल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.